बॅरिस्टर ए. आर. अंतुले जयंतीनिमित्त वसंतराव नाईक महाविद्यालयात अभिवादन सोहळा संपन्न
| आगरदांडा | गणेश चोडणेकर |
बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेबांनी नेहमीच तळागाळातील माणसाचा विचार करुन अनेक योजना राबविल्या. त्यामधील संजय गांधी निराधार योजना या योजनेमधुन आज ही गरीब असह्य महिलांना त्यांच्या लाभ मिळत आहे. पोलीस दलाला हा नवीन गणवेश मिळवून दिला. त्याचे श्रेय अंतुले साहेबांना जाते. अंतुले साहेब हे केवळ नेते नव्हते तर ते श्रीमती इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती सहकारी होते. तसेच सामान्य जनतेचे नेते होते, असे प्रतिपादन ॲड.इस्माईल घोले यांनी कोकण उन्नती मित्रमंडळाचे वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, मुरुड-जंजिरा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा कार्यक्रमावेळी बोलत होते. पुढे म्हणाले की साहेबांची पक्षाप्रती निष्ठा इतकी अढळ होती की, कठीण प्रसंगात त्यांनी दिलेला राजीनामा त्यांच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाचे प्रतीक ठरला गेला होता.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते अंतुले साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तद्नंतर मुरुड आदिवासी वाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुड आणि संजीवनी डायलिसिस सेंटर येथे रुग्णांना व गरजूंना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. इस्माईल घोले, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. विश्वास चव्हाण, डॉ.श्रीशैल भैरगुंडे, डॉ.सुभाष म्हात्रे, डॉ.गजानन मुनेश्वर, वासंती उमरोटकर, संदेश दांडेकर, मोहित हसवारे, डॉ.नारायण बागुल, गणेश लाड, प्रा. प्रवेश पाटील, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे म्हणाले की, महाविद्यालयाच्या उभारणीत आणि प्रगतीत संस्थेचे व साहेबांचे असलेले योगदान विषद केले. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य वासंती उमरोटकर यांनी अंतुले साहेबांच्या शिस्तीबद्दल आणि त्यांच्या कार्याप्रती असलेल्या निष्ठेबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, साहेब केवळ नेते नव्हते, तर ते एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
विश्वास चव्हाण यांनी साहेबांच्या प्रशासकीय कौशल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, कोकणचा विकास हा साहेबांच्या ध्यासाचा विषय होता. कोणत्याही कामात होणारा विलंब त्यांना मान्य नसे, तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असत.
संदेश दांडेकर यांनी सांगितले की, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ आम्हाला साहेबांकडूनच मिळाले. अन्याय करणे जितके चुकीचे आहे, तितकेच अन्याय सहन करणे ही मोठी चूक आहे, हे त्यांचे वाक्य आजही आमच्यासाठी मंत्रासारखे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवेश पाटील यांनी केले, तर आभार डॉ. नारायण बागुल सर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.







