पाणी टंचाई कृती आराखड्यात पावणे दोन कोटीची तरतूद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी मुबलक पुरवठा व्हावा, म्हणून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना काही वर्षापुर्वी राबविण्यात आल्या. परंतु, या योजनांमधील पाईप व संपवेल आदी दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनांन आता दुरुस्तीचाआधार देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. पाणी टंचाई कृती आराखड्यात यावर्षी नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तासाठी दोन कोटी 74 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 85 गावे व 15 वाड्या अशा एकूण शंभर ठिकाणी हा निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून उपलब्ध झाली आहे.
रायगड जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती असून दोन हजारहून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारहून अधिक आहे. जिल्ह्यातील अनेक गावे, व वाड्यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागामार्फत पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील उमटे, तिनविरा, कुसूंबळे, रेवस झोन एक व रेवस झोन दोन या पाच योजनांचा समावेश आहे. या योजनांद्वारे अलिबाग तालुक्यातील एक लाखहू अधिक नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यातील लाखो नागरिकांना या योजनांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पाण्याच्या योजना 40 हून अधिक वर्षाच्या आहेत. त्यामुळे या योजनांसाठी राबविण्यात आलेले पाईप खराब व जीर्ण झाले आहेत. अनेक वेळा पाईपला गळतीचा प्रश्न निर्माण होतो. पाईप लिकेजमुळे गावे, वाड्यांमध्ये मुबलक पाणी पुरवठा होत नाही.
पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. हा प्रश्न सोडविण्यासाठी यावर्षी पाणी टंचाई कृती आराखड्यात नळ पाणी पुरठा योजना विशेष दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अनेक योजना होऊनही पाणी नाही, पाईप नादूरुस्त आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन कोटी 74 लाख 84 हजार रुपयांचा अपेक्षीत खर्च आहे. त्यामध्ये 85 गावे व 15 वाड्या अशा एकूण शंभर ठिकाणी हा निधी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील उमटे, तिनविरासह अनेक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पाईपची दुरुस्ती करण्यापासून वेगवेगळी कामे या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जून्या विहीरी दुर्लक्षीत
रायगड जिल्ह्यामध्ये मागील दीड वर्षपासून जलजीवन योजना राबविण्यात आल्या. पाण्याचा स्त्रोत शोधून जलजीवन योजनेअंतर्गत पाईप टाकण्यापासून हजारो लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी विहीरी खोदण्यात आल्या आहेत. यावर्षी पाणी टंचाई कृती आराखड्यामध्ये सार्वजनिक विहीरी खोल करण्याबरोबरच गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. जिल्हयातील 174 ठिकाणी या विहीरींचे काम केले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी 72 लाख रुपयांच्या निधी खर्च होण्याची अपेक्षा आहे. मात्र जलजीवन योजनांनंतर जिल्ह्यातील अनेक जुन्या सार्वजनिक विहीरी दुर्लक्षीत असल्याचे चित्र आहे. काही विहींरीमधील जाण्याचा मार्गांवर अतिक्रमण झाले आहे. काही विहीरींची वेळवर दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे त्यांना गवत, झुडपांनी विळखा घातला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
