सावधान! तीन दिवस धोक्याचे

हवामान खात्याचा रायगडला ऑरेंज इशारा
जिल्हाधिकार्‍यांचेे प्रशासनाला निर्देश,जनतेला आवाहन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सावधान,रायगडवासियांनो, हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील तीन दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत तर जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करीत सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पुढील तीन दिवस होणार्‍या संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (दि.29 ) वेब एक्स या ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीबाबत संपूर्ण आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
या ऑनलाईन बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव डॉ.पद्मश्री बैनाडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम,औद्योगिक सुरक्षा, आरोग्य या विभागांचे अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी संभाव्य अतिवृष्टीनंतर किंवा दरड कोसळल्यानंतर उद्भवणार्‍या परिस्थितीबाबत केल्या जाणार्‍या खबरदारीच्या उपाययोजनाबाबत संपूर्ण जिल्ह्याचा प्रांतनिहाय सविस्तर आढावा घेतला. याबाबत प्रशासनातील सर्व अधिकार्‍यांनी अत्यंत सतर्कता बाळगावी. मुख्यालय सोडू नये. मुख्यत्वे स्थानिक प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी कृषी अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी विशेष सजगता बाळगावी. डंपर, जेसीबी, पोकलेन, सर्चलाईट, रबर बोटी इतर महत्त्वाच्या साहित्य वितरण व्यवस्थेचे चोख नियोजन करावे,असे सुचित केले.

नागरिकांमध्ये जनजागृती करा
नागरिकांमध्ये संभाव्य अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीबाबत जास्तीत जास्त जागृती करावी. जनतेला योग्य माहिती द्यावी. प्रशासनाने समुद्रकिनार्‍यावरील भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी भरतीच्या वेळांची नोंद घेऊन त्याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आपत्तीच्या वेळी सर्वांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून ठरवून दिलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

अशा संकटसमयी सर्वांनी टीम म्हणून एकमेकांना खंबीर साथ देत प्रत्येक आव्हानाचा यशस्वी सामना करण्यासाठी सज्ज रहावे.
डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी

या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी महाड पूरपरिस्थितीत उत्तम काम केलेल्या महेश सानप, प्रशांत साळुंखे, गुरुनाथ साटेलकर यांच्या रेस्क्यू टीमचे व इतर सर्वांचेच अभिनंदन करून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय बचावकार्याबाबत आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,पोलीस अधीक्षक अशोक दुधे पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख,अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव आदींनी विविध सुचना मांडल्या. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी आभार मानले.

Exit mobile version