बोटींनी तोडलं कांदळवन; कांदळवन विभाग कुंभकर्णी झोपेत
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बेली आणि आक्षी परिसरातील खाड्यांमध्ये शेकडो बोटी थेट कांदळवनात घुसवून उभ्या केल्याने मोठ्या प्रमाणावर कांदळवनाची हानी झाली आहे. मात्र, हाकेच्या अंतरावर कार्यालय असलेल्या कांदळवन विभागाला हे दृश्य दिसत नाही का, की त्यांनी जाणीवपूर्वक डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कांदळवन संवर्धनाचे गोडवे गाणाऱ्या आणि एखाद्या सामान्य नागरिकाने कांदळवनाला धक्का लावला तरी तत्परतेने गुन्हे दाखल करण्यासाठी धावणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बेली आणि आक्षी खाडीत शेकडो बोटी कांदळवनाच्या मुळांमध्ये घुसवून बांधण्यात आल्याने अनेक ठिकाणी कांदळवन तुटले असून, त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली नियमांचा बडगा उगारणाऱ्या याच विभागाचे अधिकारी या प्रकरणात मात्र कमालीचे शांत आहेत. त्यामुळे ‘नियम फक्त सर्वसामान्यांसाठी आणि धनदांडग्यांसाठी मोकळे रान’ अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. कांदळवनाची उघडपणे होत असलेली तोड आणि त्यावर विभागाची मौन भूमिका पाहता, या प्रकारामागे नेमके कोणाचे हितसंबंध जपले जात आहेत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करावेत, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि कांदळवनाच्या विनाशाला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, कांदळवन विभागाची दुटप्पी भूमिका आणि निवडक कारवाईचे आरोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
कांदळवनाचे महत्त्व काय?
कांदळवन हे किनारी भागातील नैसर्गिक संरक्षक कवच मानले जाते. समुद्राची धूप रोखणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे, माशांच्या प्रजननासाठी सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देणे आणि वादळांच्या तडाख्यापासून किनाऱ्यांचे रक्षण करणे, अशी महत्त्वाची भूमिका कांदळवन बजावते. त्यामुळे कांदळवनाची होणारी हानी ही केवळ पर्यावरणालाच नव्हे तर, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही धोकादायक ठरू शकते.
गुन्हे दाखल होणार का?
कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण, तोडफोड किंवा पर्यावरणाची हानी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार कांदळवन विभागाकडे आहेत. मात्र, बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटी कांदळवनात घुसवून उभ्या असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यामुळे या प्रकरणातील जबाबदारांवर गुन्हे दाखल होणार की त्यांनाच अभय दिले जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.








