28 धरणांमध्ये केवळ 13.287 एमसीएम पाणी; अवघे पंधरा दिवस पुरेल इतकेच पाणी
| चौल | राकेश लोहार |
रायगड जिल्ह्यावरील मान्सूनचे ढग गायब झाले असून, जलसंकटाचे काळे ढग अधिकच गडद झाले आहेत. परिणामी, धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर घसरला असून, तो जेमतेम पुढील 15 दिवसच पुरेल, अशी धक्कादायक माहिती जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. नद्या-नाले कोरडे पडले आहेत, नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत जिल्ह्यातील 28 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये केवळ 13.287 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक असून, उपयुक्त साठा अवघ्या 19.39 टक्क्यांवर आला आहे. परिणामी, अनेक गावांची टँकरवर भिस्त वाढली असून, आगामी काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील 28 लघु पाटबंधारे प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता 68.515 दशलक्ष घनमीटर (एमसीएम) इतकी आहे. मात्र, सध्या या धरणांमध्ये केवळ 13.287 एमसीएम पाणी उपलब्ध आहे, अशी माहिती रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता किती तीव्र झाली आहे, हे दिसून येते. दरम्यान, अनेक गावांतील पारंपरिक जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यात सध्या 78 हून अधिक टँकर्सच्या माध्यमातून जवळपास दीड लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
जून महिना अर्धा उलटूनही धरणांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून उपलब्ध साठा मर्यादित असल्याने अनेक भागांत पाणीपुरवठ्यावर निर्बंध आणण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता मोहन सरवदेे यांनी सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा जेमतेम 15 दिवस पुरेल, असे स्पष्ट केले आहे. पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर पाणीकपात करण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या आदेशानुसार यापुढे औद्योगिक प्रकल्पांमधील पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली असून, पिण्यासाठीच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सरवदे यांनी स्पष्ट केले. मात्र, पंधरा दिवसात पाऊस पडला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी आतापासून आकस्मिक आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर देणार असल्याचे सरवदे यांनी सांगितले.
सुधागड, खालापूरात तुलनेने जास्त साठा
जिल्ह्यातील सर्वाधिक पाणीसाठा सुधागड तालुक्यात असून, कोंडगाव (3.341 एमसीएम), घोडवडे (2.768 एमसीएम), ढोकशेत (2.633 एमसीएम), कवेळे (2.817 एमसीएम) आणि उन्हेरे (1.859 एमसीएम) या धरणांमध्ये मिळून 13.418 एमसीएम पाणी उपलब्ध आहे. खालापूर तालुक्यातील भिलवले (2.100 एमसीएम), कलोते-मोकाशी (4.190 एमसीएम) आणि डोणवत (3.670 एमसीएम) या धरणांमध्ये मिळून 9.960 एमसीएम साठा शिल्लक आहे.
महाड तालुक्यातील वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे या धरणांमध्ये मिळून 8.371 एमसीएम, तर श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले, कुडकी आणि रानिवली धरणांमध्ये मिळून 6.106 एमसीएम पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील काही प्रकल्पांमधील पाण्याची टक्केवारी एक अंकी आकड्यावर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दुसरीकडे वावा (50 टक्के), आंबेघर (41 टक्के), सुतारवाडी (39 टक्के), भिलवले (39 टक्के) आणि मोरबे (37 टक्के) या धरणांमध्ये तुलनेने अधिक पाणी शिल्लक असले तरी जिल्ह्याच्या एकूण परिस्थितीवर त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे चित्र आहे.
तालुकानिहाय पाणीसाठा
सुधागड 13.418 एमसीएम
खालापूर 9.960 एमसीएम
महाड 8.371 एमसीएम
श्रीवर्धन 6.106 एमसीएम
पनवेल 5.600 एमसीएम
कर्जत 4.230 एमसीएम
म्हसळा 4.013 एमसीएम
उरण 3.710 एमसीएम
तळा 3.134 एमसीएम
अलिबाग 2.953 एमसीएम
पेण 2.490 एमसीएम
मुरुड 2.266 एमसीएम
रोहा 2.264 एमसीएम
आकाशाकडे लागले डोळे
जूनचा अर्धा महिना उलटल्यानंतरही धरणांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. उलट, जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या वाढत असून अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. मान्सून लवकर सक्रिय होऊन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला तरच रायगडकरांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक आकडेवारीः
एकूण धरणे : 28
एकूण साठवण क्षमता : 68.515 एमसीएम
उपलब्ध पाणीसाठा : 13.287 एमसीएम
जिल्ह्याचा सरासरी उपयुक्त साठा : 19.39 टक्के
टँकर फेऱ्या : 78
रायगड जिल्ह्यातील 28 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 13.287 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, उपयुक्त साठा 19.39 टक्क्यांवर आला आहे. जून महिना अर्धा उलटूनही धरणांमध्ये अपेक्षित पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे जलसाठ्याची परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाच्या पुढील स्थितीनुसार पाणी नियोजन करावे लागणार आहे.
राकेश धाकतोडे,
कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड
सध्याचा उपलब्ध पाणीसाठा विचारात घेतल्यास अनेक योजनांमध्ये जेमतेम 15 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर पाणीकपात करण्याशिवाय पर्याय नाही. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
मोहन सरवदे,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी, रायगड जिल्हा





