। अलिबाग । प्रतिनिधी ।
देशात आणि राज्यात बेरोजगारीसह महिलांचा सन्मान, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हे सरकार सत्तेत बसण्याच्या लायकीचे नाही. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी महिलांनी सज्ज व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केले.
प्रकल्पाच्या नावाखाली लाखो हेक्टर जमीन घेऊन शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करत आहे. फक्त जाहिरातबाजी करुन नागरिकांना पर्यायाने मतदारांना भुलवण्यात येत आहे. यासाठी हजारो कोटींचे कर्ज डोक्यावर घेतले आहेे. ते फेडण्यासाठी कराच्या रुपातून तुमच्या-आमच्याकडूनच पैसे वसूल केले जातील. एका हाताने द्यायचे आणि दुसर्या हाताने वसूल करायचे, असा धंदा या सरकारचा सुरु आहे, असे जबरदस्त टीकास्त्र महाजन यांनी डागले.
रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत ‘लेक शिवबा’ची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन पेझारी येथील भैरवनाथ क्रीडा मैदानात मंगळवारी (दि.1) करण्यात आले. यावेळी उल्का महाजन बोलत होत्या.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा तथा माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख प्रीती पाटील, सरपंच प्राजक्ता म्हात्रे, उपसरपंच अॅड. मनोज धुमाळ, अनिता पाटील, भैरवी जाधव-पाटील आदी मान्यवरांसह फेडरेशन व महिला आघाडीच्या पदाधिकारी, सभासद, जिल्हा परिषद मतदारसंघ कुर्डूस व शहापूर विभागातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शौर्याने ही भूमी पावन झालेली आहे. याच भूमीत नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप झाला. खोतीविरोधात ते लढले होते. या लढ्यातून स्वाभिमानाची, हक्काची शिकवण मिळाली आहे. ती शिकवण घेऊन महिलांनी या सरकारविरोेधात लढा दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीच्या तोंडावर या सरकारला बहिणीकरिता दीड हजार रुपये देणे का सुचले? विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर इतकी माया का उफाळून निघाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या लाडक्या भावाचे लाड घेण्यापेक्षा संविधानाने दिलेले हक्क आपल्याला मिळविण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘लाड नको, आमचे हक्क हवे’ हा विचार घेऊनच महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराने कमविलेले पैसे आम्हाला नको, असे लाडक्या भावाला सांगून त्यांना परत पाठवा, असे त्या म्हणाल्या.
मागील लोकसभा निवडणुकीत देशात तसेच राज्यात भाजपासह महायुतीला चांगलाच दणका मिळाला. त्यांना मतांची कडकी लागली म्हणून आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून आता बहीण लाडकी झाली आहे. भावांसाठी योजना सुरु केली असून, वयोवृद्धांसाठीदेखील मोफत तीर्थयात्रा सुरु केली. योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जात आहेत. गोरगरीब, दलित, ओबीसी, आदिवासी समाजासाठी असलेला पैसा जाहिरातीसाठी वापरला जात आहे. शिष्यवृत्तीसाठी सहा-सहा महिने या समाजातील मुलांना वाट पाहावी लागते, ही मोठी चिंतेची बाब आहे. दर 16 मिनिटाला महिलेवर अत्याचार होत असल्याची आकडेवारी आहे. महिलांचा अनादर करणार्या या सरकारला पुन्हा सत्तेत बसवू नका, असे आवाहन महाजन यांनी यावेळी केले.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद मतदारसंघ कुर्डूस व शहापूर विभागातील तीसहून अधिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकारी, बँकिंग, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या कर्तृत्ववान महिलांचा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव
पेझारी येथील भैरवनाथ क्रीडा मैदानात महिलांच्या संवाद मेळाव्याला हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती दाखविली होती. चित्रलेखा पाटील, सुप्रिया पाटील, अॅड. मानसी म्हात्रे, उल्का महाजन आदी मान्यवरांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर फुलांच्या वर्षाव, तसेच सर्व महिलांनी उपस्थित राहून मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध गाण्यांवर महिलांसह मान्यवरांनी ठेका धरल्याचे दिसून आले. एक वेगळा उत्साह यानिमित्ताने प्रत्येक महिलेच्या चेहर्यावर दिसून आला.