केंद्रासाठी 2 हेक्टर जमीन; 5 कोटी 54 लाखांच्या खर्चास मान्यता
| अलिबाग | वार्ताहर |
जिल्ह्यामधील श्रीवर्धन आणि नजीकच्या तालुक्यामधील सुपारी हे अत्यंत महत्त्वाचे व व्यापारी तत्त्वावर घेण्यात येणारे नगदी बागायती पीक आहे. या पिकास प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन (विस्तारित) केंद्र निर्माण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे 2 हेक्टर जमिनीवर विस्तारित केंद्रास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच 5 कोटी 64 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
सुपारी संशोधन विस्तारित केंद्राबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत दिवेआगार येथे सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत दिवेआगार येथील सुपारी संशोधन केंद्र निर्मितीमुळे सुपारी पिकावरील संशोधनास चालना मिळेल. सुपारीच्या बुटक्या, तसेच दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याबरोबरच दिवेआगार, श्रीवर्धन परिसराचे हवामान आणि जमीन विचारात घेऊन अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या पिकाची आंतरपीक पद्धती विकसित करण्यासाठी संशोधन कार्य केले जाणार आहे.
या परिसरामध्ये होणारी सुपारीही वैशिष्ट्यपूर्ण असून, भौगोलिक मानांकनास पात्र आहे. या केंद्रामुळे रोजगारनिर्मिती होऊन शेती उत्पन्नातही वाढ होऊन परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.