हवामान विभागाने दिला इशारा
| पुणे | प्रतिनिधी |
देशभरात झपाट्याने हवामानात बदल होत आहे. बहुतांश राज्यात कमाल तापमान रोज नवा उच्चांक गाठत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस देशातील अनेक राज्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा रविवारी (दि.16) दिला आहे. देशातील अनेक प्रदेशांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअस ओलांडत असल्याने अधिकार्यांनी सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इशारे आणि सूचना जारी केल्या आहेत.
देशभरात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने रविवारी (दि.16) प्रसिद्ध केलेल्या हवामान बुलेटिनमध्ये दिला आहे. 16 ते 18 मार्चदरम्यान अंतर्गत ओडिशात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. सोमवारी 17 मार्च रोजी झारखंड, पश्चिम बंगाल, विदर्भ, उत्तर तेलंगणा येथे उष्णतेच्या लाटेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, संपूर्ण उत्तर कर्नाटकात 18 ते 20 मार्चदरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि.16) चंद्रपूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे ते भारतातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक बनले. महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी, सोलापूर आणि वर्धा यासारख्या इतर भागातही 41 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेसोबत कमी आर्द्रता असल्याने लोकांच्यामध्ये अस्वस्थता वाढत आहे. विदर्भातील अनेक भागात तापमान सामान्यपेक्षा 3-6 अंश सेल्सिअस जास्त आहे. उष्णतेच्या लाटेपासून तात्काळ आराम मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. येत्या काही दिवसांतही विदर्भात उष्णता कायम राहणार असल्याचेदेखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.