पाच वर्षात कौटूंबिक वादाची 478 प्रकरणे निकाली
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
विविध अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलिस मदत, महिला हेल्पलाइन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा अशा अनेक सेवेच्या माध्यमातून मानसिक बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरु करण्यात आले आहे. पाच वर्षात कौटूंबिक वादाची 478 प्रकरणे निकाली काढण्यास भरोसा सेलला यश आले आहे. त्यामुळे भरोसा सेल पिडीतांना आधार बनल्याचे चित्र आहे.
कौटूंबिक वादामुळे अनेक महिलांचे लैंगिक, मानसिक व आर्थिक स्वरुपाचे शोषण होते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेकवेळा पिडीतांचे खच्चीकरण होते. वेळप्रसंगी पिडीत आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा मार्ग स्विकारतात. महिला समाजात सक्षमपणे उभ्या राहिल्या पाहिजे. त्यांना अत्याचाराविरोधात लढण्यासाठी बळ मिळावे म्हणून रायगड जिल्ह्यात 9 मार्च 2020 मध्ये भरोसा सेलची स्थापना करण्यात आली. या कक्षामध्ये दोन अधिकारी व सहा पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भरोसा सेलच्या कार्यालयात दाखल झालेल्या तक्रारींचे निरसन करण्याचे काम वेगवेगळ्या पध्दतीने केला जाते. त्यामध्ये पोलिस मदत, महिला हेल्पलाइन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, विधीविषयक सेवा, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण आदी सोयी सुविधांचा त समावेश आहे.
वेगवेगळ्या स्तरावर या प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यामध्ये पाच वर्षापुर्वी सुरु झालेल्या भरोसा सेलला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.सुरुवातीला 50 तक्रारी दाखल झाल्या होत्या. हळूहळू तक्रारीत वाढ झाली. या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न कायमच सेलच्या अधिकारी व कर्मचार्यांमार्फत करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये 498 प्रकरणे या कार्यालयात दाखल झाले. यापैकी 478 प्रकरणांचा निपटारा करीत पिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न भरोसा सेलच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 2020 पासून ते 2023 पर्यंत दाखल झालेले सर्वच प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. 2024 मध्ये दाखल झालेल्या 95 तक्रारी अर्जापैंकी 75 अर्ज निकाली काढले असून 20 प्रकरणे प्रलंबित आहेत. ही लवकरच निकाली काढली जाणार असल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.
कौटूंबिक वादाचे दाखल झालेल्या प्रकरणावर दृष्टीक्षेप
वर्षे | प्राप्त तक्रारी अर्ज | निकाली लावलेले अर्ज |
2020 | 50 | 50 |
2021 | 105 | 105 |
2022 | 114 | 114 |
2023 | 134 | 134 |
2024 | 95 | 75 |
एकूण | 498 | 478 |