। मुंबई । प्रतिनिधी ।
कोकणातील मा. आ. राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, असं विधान भास्कर जाधव यांनी केले होते. यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे. कोणी दिली नाही, कोणत्या पक्षाने, नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही. पुढे जाऊन मी असं म्हणालो की, हे केवळ माझ्याच वाट्याला आले असे नाही, असे अनेकांच्या बाबतीत घडते, म्हणून हे माझे दुर्दैवं आहे, हा दोष मी माझ्याकडे घेतला, असे भास्कर जाधव म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या 43 वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही कुठलीही गोष्ट किंवा पद मिळवण्याकरिता मी कधी नौटंकी केली नाही. मी कधी नाटकबाजी केली नाही, रडगाणं गात बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळाले तर माझ्या नशिबाने. म्हणून हे मी विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याकरिता करत आहे. त्यासाठी पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाधव म्हणाले आहेत.