मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून कर्जत येथे पाहणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले बांधली जात आहेत. या घरकुलांचे कामे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व्हावीत आणि कर्जत तालुक्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे, असे शासनाचे निर्देश आहेत. यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात गावदौरा केला. कर्जत तालुक्यात 1845 एवढी घरकुलांपैकी 1835 घरकुलांची कामे मंजूर झाली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जनमान योजनेमधून दारिद्य्ररेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून कर्जत पंचायत समिती हद्दीमधील 55 ग्रामपंचायतींमध्ये 1835 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने 100 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्या काळात या सर्व घरकुलांबाबत उचित कार्यवाही करण्याची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यांच्यासह कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायती यांचा दौरा केला. 15 फेब्रुवारी रोजी सरकारी सुट्टी असतानादेखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून तालुक्यातील ग्रामपंचायती यांना भेटी देण्यात येत होत्या.
शासन निर्णयान्वये क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयाकरिता 100 दिवसांचा उपक्रम अंतर्गत राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव सुरेश डवले यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात घरकुले योजना यशस्वी व्हावी म्हणून भेटी सुरु आहेत. डॉ. भारत बास्टेवाड यांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला, त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत उमरोली येथील घरकुलांची पाहणी केली तसेच लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. पुढे ग्रामपंचायत नेरळ येथील घरपट्टी, पाणीपट्टी वसुली तसेच वसुली कर्मचारी यांना वसुली व उत्पन्न वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले.
पंचायत समिती कर्जतमधील प्रभाकर बोरकर सहा. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तर अधिकारी उज्ज्वला भोसले हे या दौर्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत होते.