। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील एस.एस. निकम इंग्रजी शाळेत दि.14 व 15 फेब्रुवारी रोजी ‘रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील रायगड जिल्ह्यातील पहिलेच मॉडेल प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे रोबोटिक्स विषयातील तज्ज्ञ डॉ. हर्षदीप जोशी यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी डॉ. जोशी यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले की, संपूर्ण रायगड जिल्ह्यात अगदी प्राथमीक वर्गापासून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणारी एस.एस. निकम ही पहिली शाळा असल्याचे सांगितले. तसेच, माणगाव मेडीकोजच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा राऊत म्हणाल्या की, निकम शाळा नेहमीच भविष्याच्या वेध घेऊन शैक्षणिक क्षेत्रात योग्य वेळी योग्य पाऊल उचलत असते. ही गौरवास्पद बाब आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन डॉ. मदन निकम होते. तर, प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष हर्षदा काळे, माणगाव मेडिकोजच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा राऊत, डॉ. सायली चुटके, वरून घोळे, शिक्षणाधिकारी कार्यालय अलिबागचे अधीक्षक सुभाष शिंदे, सुभाषभाई मेथा, अमृतभाई दोशी, संस्थेचे पदाधिकारी व सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.