भाजपाला रोखण्यासाठी आवळली वज्रमूठ; नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार भावना घाणेकर यांनी शनिवारी (दि.15) वाजतगाजत मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याकडे दाखल केला आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10 मधून महाविकास आघाडीच्या 21 नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महावि-शेकाप व मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत हम भी कुछ कम नहीं, असे भाजपला दाखवून दिले आहे.
उरण नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी -शेकाप व मनसे एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. यामुळे या निवडणुकीत भाजपचे आमदार महेश बालदी यांच्यासमोर जोरदार आव्हान उभे ठाकणार आहे. तसेच उरणकरांनाही आणखी एक नवा पर्याय मिळणार आहे. यामध्ये आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा भावना घाणेकर या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. उरण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उरण शहर हा उरणचे आमदार महेश बालदी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शहरात असणारी महेश बालदी यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडी-शेकाप व मनसे एकत्र आली आहे.
यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत, शेकापचे तालुका चिटणीस तथा कामगार नेते रवी घरत, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मिलिंद पाडगावकर, अखलाक शिलोत्री, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनंत भिंगारी, जय्यद नूरमुला, काँग्रेस शहराध्यक्ष उफराण तुंगेकर, नरेश घरत, दीपक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा हेमलता पाटील, गणेश उर्फ नाना नलावडे, अरुण तेंलणे, सह महावि-शेकाप, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ही निवडणूक धनशक्तीविरोधात जनशक्ती अशी असली तरी उरण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवडणुकीला सामोरे जात असून, जनता जनार्दनाचा पाठिंबा हा निश्चितच मला लाभणार आहे.
– भावना घाणेकर







