रेवदंडा । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. यास्पर्धेत नागाव शिक्षण संस्था प्राथमिक शाळेच्या भावेश्री वाळंज ग्रुप प्रथम क्रमांक तर व्दितीय क्रमांक नागाव श्रध्दाश्रम विदयामंदिरच्या दहावीतील विदयार्थीनी तनिशा आठवले तर तृतीय क्रमांक नागाव शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मानसी ठाकूर ग्रुप यांनी पटकाविला. स्पर्धा सर्वासाठी खुली ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत पोस्टर मेकिंगसाठी बालस्नेही गांव, स्वच्छ व हरित गाव, लिंग समभाव पोषक गाव असे विषय देण्यात आले होते. स्पर्धकांनी बनविलेले पोस्टर रविवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत नागाव ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आले. या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम नागाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर, ग्रा.प.सदस्या हर्षदा मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व स्पर्धकांचा उपस्थितीत घेण्यात आला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रूपये 2500 रोख रक्कम व प्रशस्ती पत्र, तसेच व्दितीय क्रमांकास रूपये 1500 रोख रक्कम व प्रशस्ती पत्र, तृतीय क्रमांकास रूपये 1000 रोख रक्कम व प्रशस्ती पत्रक सरपंच निखिल मयेकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.