माथेरानसाठी ‘भावोजी’ आले धावून

आदेश बांदेकर यांच्या प्रयत्नाने; अडीच कोटींचा निधी
| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेला विकास निधी माथेरानच्या विविध पॉईंट्सच्या सुशोभीकरणासाठी वापरण्यात येणार असताना दोन कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी शासन निर्णयानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करून कर्जत आणि खोपोली नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आला होता.मात्र तो आता पुन्हा माथेरान पालिकेक़डे वर्ग करण्यात आला आहे.त्यासाठी माथेरानचे पर्यटन राजदूत आदेश बांदेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

माथेरान मधील प्रेक्षणीय स्थळांच्या सुशोभीकरण कामासाठी नगरविकास विभागाने अडीच कोटी चा मंजूर केलेल्या निधी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कर्जत आणि खोपोली नगरपरिषद मधील विकास कामांसाठी वळवून घेतला होता.त्यामुळे माथेरान मधील कामे प्रलंबित राहत होती. ही बाब माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या लक्षात येताच माथेरानमधील दुर्गम भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी महत्वपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.विकास निधी शर्थीचे प्रयत्न करुन माथेरानसाठी पुन्हा वर्ग करुन घेत मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे माथेरानमधील आवडते प्रेक्षणीय पॉईंट्स पैकी वन ट्री हिल, मालडुंगा, खंडाळा आणि बेलवर्ड या पॉईंट्ससाठी या ठिकाणी केली जात असलेली कामे खोळंबून राहिली होती.त्या अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करुन पर्यटनासाठी सुसज्ज असे केंद्र बनवले जाणार होते.

नगरविकास विभागाकडून निधी मंजूर केल्यानंतर चारही पॉईंट्सची निम्म्याहून अधिक कामे पूर्णत्वास आलेली होती.त्यामुळे निधी परस्पर कर्जत आणि खोपोली या रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी वळविला होता.त्यामुळे सदरचा निधी कुठल्याही परिस्थितीत माथेरानच्या विकास कामासाठी आणणे आवश्यक बनले होते. याकामी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि नगरपरिषदेचे सभागृह गटनेते प्रसाद सावंत यांनी माथेरानचे पर्यटन राजदूत आदेश बांदेकर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मात्र आदेश बांदेकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून माथेरानच्या विकासात्मक प्रमाणात कामांसाठी मंजूर केलेला निधी पुन्हा माथेरान नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात यावा असे सुचविले. त्याक्षणी अडीच कोटी रुपयांचा विकास निधी माथेरान नगरपरिषदेच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सुध्दा विशेष प्रयत्न केले.

पर्यटन राजदूत आदेश बांदेकर यांनी केवळ माथेरानवर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी हा मोठा विकास निधी पुन्हा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे भविष्यात माथेरानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आदेश बांदेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळणार आहे
प्रसाद सावंत-गटनेते

Exit mobile version