| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत दिशेकडून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात असलेल्या पादचारी पुलावर बनविण्यात आलेला पृष्ठभाग समपातळीत बनविण्यात आलेला नाही. त्यामुळे या पादचारी पुलावर पावसाचे पाणी साचून राहत असून प्रवाशांना त्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे.
मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कर्जत आणि मुंबई दिशेकडे असे दोन पादचारी पुल आहेत. त्यातील मुंबई दिशेकडे असलेला पादचारी पुल अरुंद असून या पुलावरून स्थानकाच्या बाहेर पडण्याची व्यवस्था आहे. मात्र, या पादचारी पुलावर पावसाचे पाणी साचत आहे. अद्याप मौसमी पाऊस सुरू झालेला नाही, तरी देखील अवकाळी पावसामध्ये पादचारी पुलावर पाणी साचून राहत आहे. पुलावरील पृष्ठभाग हा सम पातळीवर बनविला गेला नाही आणि त्यामुळे पुलावर पाणी साचून राहत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा थेट परिणाम या पादचारी पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. त्यांना या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे त्या पादचारी पुलावर साचून राहणाऱ्या पाण्याबद्दल कार्यवाही करावी, अशा सुचना प्रवासी संघटनेच्या माध्यमातून किशोर गायकवाड, महेश कडव, राजेश विरले यांनी केले आहे.