वेश्वी जलजीवन मिशन योजनेचा भूमिपूजन सोहळा संपन्न
| रायगड | प्रतिनिधी |
वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये विकास करण्यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. कार्यक्रमांमधून ग्रामपंचायतीचा विकास करण्याच्या पोकळ घोषणा करताना दिसत आहेत. जनाधार मिळविण्यासाठी विकास करण्याचा पाढा वाचणाऱ्यांना वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये विकास करण्याची संधी उपलब्ध होणार नाही. कारण, या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास झाला आहे. जनतेने मागणी करण्यापूर्वीच ही विकासकामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दहा वर्षांत ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या विकासकामांवर खर्च झालेला निधी लक्षात घेता आतापर्यंत कोणत्याही विरोधकांनी मागील सरपंचावर आरोप करण्याची हिंमत केलेली नाही. वेश्वी ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाचीच राहणार आहे. येथील शेकापच्या कार्यकर्त्यांची एकजूट भूषणावह आहे. या एकजुटीचा कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यायला हवा, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये वेश्वी-वाडगाव फाटा जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा भूमिपजन सोहळा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते बुधवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, चेंढरे ग्रामपंचातीचे माजी सरपंच दत्ता ढवळे, ॲड. प्रशांत राऊळ, वेश्वी ग्रामपंचायत सदस्य आरती पाटील, रवींद्र पाटील, अनंत मुलुस्कर, राजेंद्र राऊळ, जुई शेळके, मृदला मगर, रुपाली गुरव, विष्णू मगर, सदानंद शेळके, गजानन नाईक, सुभाष पाटील, जनार्दन बारस्कर, सुरेश शेळके, अरुण पाटील, मधुकर थळे, यशवंत पाटील, सुनील राऊळ, गजानन राऊळ, मिलिंद मगर, निलेश मगर, विनय गुरव, विलास गुरव, संदीप घरत, विनोद ठाकूर, सुधाकर राऊळ, सुरेंद्र शेळके, पद्माकर पाटील, महादेव शेळके, संदीप म्हात्रे, संजय म्हात्रे, राम धनवी, कृष्णा धनवी, सुभाष पेडणेकर आदी वेश्वी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग तालुका एमएमआरडीएमध्ये वर्ग झाल्याने भविष्यात विकास अधिक झपाट्याने होईल. अलिबाग तालुक्यात चटई निर्देशांक दोनपर्यंत पोहोचला असल्याने चौदा मजली टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत. वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये होणारा भविष्यातील विकास वाडगाव फाटा परिसरात होणार आहे. या परिसरात वाढलेल्या चटई निर्देशांकामुळे अधिक प्रमाणात बांधकामे केली जाणार आहेत. यामुळे या बांधकामांना आणि नागरिकांना लागणारे पाणी ही समस्या ओळखून वेश्वी-वाडगाव फाटा जलजीवन मिशन योजना राबविण्यासाठीचा निधी शासनाकडून प्राप्त करून घेतला आहे. या योजनेमुळे वेश्वी-वाडगाव फाटा येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळणे शक्य होणार आहे, असे आ. पाटील म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील निम्मे तालुके एमएमआरडीएमध्ये वर्ग झाले आहेत. एमएमआरडीएबरोबरच सिडकोच्या विकासाच्या टप्प्यात हे तालुके येतात. महामार्गांच्या जाळ्यांमुळे तिसरी मुंबई म्हणून या तालुक्यांकडे पहिले जात आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आता औद्योगिक क्षेत्र तयार होण्यापेक्षा निवासी क्षेत्र तयार करण्यावर शासनाने भर द्यायला हवा. वाढत्या नागरीकरणामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणांचा विकास करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. गेली पंचवीस वर्षे एमएमआरडीएमध्ये येणाऱ्या तालुक्यांसाठी दोन चटई निर्देशांकासाठीची मागणी सभागृहात करून यश मिळविले आहे. आता ग्रामपंचायतींमधील गावठाणांच्या विकासासाठी चार चटई निर्देशांक देण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये मराठा समाजासाठी समाज मंदिर मंजूर झालेले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी समाजमंदिर उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. समाज मंदिर कशापद्धतीने असावे याचा आराखडा तयार करावा. ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा सरपंच नसला तरी ग्रामपंचायतीचा सरपंच मराठा समाजाचा आहे. त्यामुळे समाज मंदिर उभारण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे आमदार पाटील म्हणाले.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ कायमच शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत राहून पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहेत. यामुळेच प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये विकासाची कामे झाली आहेत. वेश्वी ग्रामपंचायतीचा झालेला विकास केवळ आणि केवळ आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या यशस्वी प्रयत्नातून झालेला आहे. यामुळे आगामी काळात ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील म्हणले.
वेश्वी ग्रामपंचायतीमधील जलजीवन मिशन योजनेवर वेश्वीमधील निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी निरीक्षक म्हणून काम करून योजनेचे काम गुणवत्तापूर्ण करून घ्यावे. होणाऱ्या विकासाचा आणि वाढत्या नागरीकरणाचा वेध घेऊन अलिबाग शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी जलपाडा येथून एमआयडीसीची नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेमुळे कार्लेखिंड ते अलिबाग या परिसरात होणाऱ्या विकासाला चालना मिळणार आहे.
आ. जयंत पाटील







