| चिरनेर | प्रतिनिधी |
सिडको बाधीत भूमिपुत्रांच्या वाढीव गावठाण, साडेबारा टक्के विकसित भूखंड, वाढीव मोबदला तसेच पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असतांना सिडकोने बोकडवीरा गावाच्या हद्दीत मातीचा भराव करण्यास सुरुवात केली आहे. हे काम बंद करून ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी गुरुवारी (दि.8) सकाळी 10.00 वाजता ग्रामस्थांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात माजी आमदार बाळाराम पाटील हे सहभागी होणार आहेत. या भरावाच्या कामामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी यासाठी सिडको आणि पोलिसांना विनंती करून प्रथम ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करून चर्चा करावी त्यानंतर भराव करावा, अशी मागणी केली. या संदर्भात सिडको अधिकारी, पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात संयुक्त बैठक येथील गणेश मंदीरात घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी सिडकोने भरावाचे काम प्रथम बंद करून ग्रामस्थांच्या मागण्यांवर चर्चा करावी, अशी जोरदार मागणी केली. मात्र, ही चर्चा अनिर्णित राहिल्याने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. बोकडवीरा गावालगत सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे सेक्टर 41 आहे. येथील मोकळ्या भूखंडावर मंगळवार पासून कडक पोलीस बंदोबस्तात मातीचा भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.






