। अलिबाग । प्रतिनिधी ।
पाटील कुटुंबियांनी वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या. या संस्थांच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराचे साधन खुले करून दिले. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याकडे प्राधान्याने लक्ष दिले. शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल हे गतीचे प्रतिक आहे. हे जाणून ग्रामीण भागातील गरीब व गरजू मुलींना सामाजिक बांधिलकीतून सायकल देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन सीएफटीआयच्या संचालिका तथा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
सीएफटीआयच्या संचालिका तथा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने शिपिंग कॉर्पोर्रेशन ऑफ इंडियाच्या मार्फत अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील 500 गरीब, गरजू विद्यार्थिनींना सायकल वितरणाचा सोहळा पीएनपी संकुलाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापक अर्चना मॅडम, रुफीना मॅडम, तुकाराम पाटील, गोपिनाथ गंभे, संदेश विचारे, सुरेश घरत, रोहिनी पाटील, शंकर दिवकर, रुबीना बिरवाडकर, श्रीकांत वारगे, कृष्णा वारगे आदी मान्यवरांसह अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, सीएफटीआय ही संस्था मिझोरामसह अन्य राज्यात कार्यरत आहे. संस्थेचे कर्मचारी तळागाळापर्यंत जाऊन गरीब गरजूंना शोधून त्यांना या संस्थेच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिल्लीपासून अलिबागपर्यंत या संस्थेतील कर्मचारी तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून काम करीत आहेत. संस्थेचा जनतेला फायदा झाला पाहिजे, या भूमिकेतून काम केले जात आहे. एक लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी या संस्थेच्या माध्यमातून मिळाली आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी आदी विविध प्रश्न सोडविण्याची संधी यातून मिळाली आहे.
शाळकरी मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा, त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, यासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना सायकल देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मदतीने गरीब गरजूंना आधार देण्याबरोबरच भूमीपुत्रांना सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. पाटील कुटुंबियांसह शेतकरी कामगार पक्ष कायमच भूमीपुत्राच्या पाठीशी राहिला आहे. प्रभाकर पाटील यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. तोच विचार घेत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पीएनपीसारखी शिक्षण संस्था निर्माण केली. शिक्षण हा पाया आहे. भूमीपुत्रांना पुढे जायचे असेल, तर शिक्षण महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला कायमच वाहतुकीचा अडथळा राहिला आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थिनींना सायकल देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामुळे मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होत असताना त्यांच्या शिक्षणालाही गती मिळत असल्याचे समाधान आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
पाचशे मुलींना सायकल वाटप
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, कर्जत या सहा तालुक्यांतील गरीब व गरजू विद्यार्थिनींचे आमच्या टीमने सर्वेक्षण केले. त्यांच्या शिक्षणाला अडथळा ठरणारा मार्ग शोधून काढला. त्यानंतर या मुलींना सायकल देण्याचा निर्णय शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी घेतला. या सहा तालुक्यांतील पाचशे मुलींना शुक्रवारी सायकली वाटप करण्यात आल्या. शाळेत जाण्यासाठी सायकल मिळणार असल्याने प्रत्येक मुलीच्या चेहर्यावर एक वेगळा आनंद दिसत होता.
सायकलमुळे भरारी घेण्याची संधी
वाढत्या वायू, धूर प्रदूषणामुळे आरोग्य बिघडण्याचा प्रश्न कायमच आहे. सायकल हे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे साधन आहे. सायकलमुळे शाळेत जाण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. मुलींना स्वातंत्र्य मिळणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लागणार आहे. आरोग्यही चांगले ठेवण्यासाठी मदत होणार आहे. या सायकलमुळे मुलींना भरारी घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, सायकल चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालनदेखील प्रत्येक मुलीने करावे. तसेच चांगला अभ्यास करून मोठे व्हा, असा मोलाचा संदेश शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक अर्चना मॅडम यांनी दिला.