उरणमधील विद्युत निमिर्ती प्रकल्पात मोठा स्फोट; ३ जण गंभीर भाजले

। उरण । वार्ताहर ।
उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात आज बॉयलरचा स्फ़ोट होऊन त्यातील उकळते पाणी अंगावर पडून ३ जण गंभीर भाजले आहेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये काम सुरू असताना अचानक बॉयलरला जोडलेल्या बीसीसी पंप हायप्रेशरने फुटला. सदर पंपातील उकळते पाणी घटनास्थळी कामाला असलेल्या कामगारांच्या अंगावर उडाल्याने ते गंभीर स्वरूपात भाजले आहेत. यामध्ये ज्युनियर इंजिनिअर विवेक धुमाळ, टेक्निशियन कुंदन पाटील (रा. उरण-डोंगरी) व लेबर विष्णू पाटील (रा. उरण बोकडविरा) यांचा समावेश असल्याचे समजते.

त्यांना त्वरित जेएनपीएच्या अंब्युलन्सने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु गंभीर स्वरूपाचे भाजले असल्याकारणाने त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुबंई अपोलो हॉस्पिटल ऐरोली येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. या विद्युत केंद्रातील बॉयलरसह इतर उपकरणांची २५ वर्षानंतर तपासणी करणे आवश्यक असताना तशा प्रकारची तपासणी करण्यात आली नसल्याने सदर अपघात घडला असल्याची माहिती येथील एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला दिली. तरी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची करावी अन्यथा भविष्यात त्याचे दुष्परिणाम येथील जनतेला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version