| अलिबाग | प्रतिनिधी |
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला लाखोच्या संख्येने भाविक दाखल होतात. भाविकांचा प्रवास सूखकर व आरामदायी व्हावा, म्हणून एसटी महामंडळ रायगड विभागाने एसटी बसचे नियोजन केले आहे. त्यासाठी 55 बसेस सोडल्या जाणार आहेत. पंढरपूरसाठी रायगडची एसटी सज्ज असल्याची माहिती विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी दिली.
पंढरपूर हे भाविकांचे तिर्थस्थान म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीला भाविक विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जातात. जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भाविक जातात. काहीजण खासगी वाहनाने तर काही जण चालत तरकाही जण एसटी बसचा आधार घेत माऊलीच्या दर्शनसाठी जातात. यावर्षी आषाढी एकादशी 6 जूलैला आहे. पंढरपूरला जाण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी तयारी सूरू केली आहे. भाविकाना पंढरपूरला वेळेवर पोहचता यावे, त्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, म्हणून एसटी महामंडळ रायगड विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील आठ एसटी बस आगारातून 55 बसेस पाठविल्या जाणार आहेत. त्याची बुकींग व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रुप बुकींग व्यवस्था
अलिबागसह जिल्ह्यातील अन्य एसटी बस आगारात आरक्षण व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना पंढरपूरला वेळेवर पोहचता यावे, तसेच थेट प्रवास करता यावा, म्हणून एसटी महामंडळाकडून ग्रुप बुकींगची व्यवस्था केली आहे. एका गावातून 40हून अधिक प्रवासी भेटल्यास त्यांना थेट ग्रुप बूकींगद्वारे पंढरपूरपर्यंत सोडण्याचे काम केले जाईल अशी माहिती उपलब्ध झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.