मोठी बातमी! जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालक यांची हत्या

। जम्मू-काश्मीर । वृत्तसंस्था ।

जम्मू काश्मीरमध्ये हेमंत लोहियानावाच्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची सोमवारी रात्री उशिरा 11.45 च्या सुमारास हत्या करण्यात आली आहे. हेमंत लोहिया हे जम्मू काश्मिरमध्ये जेलचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. ज्या मित्राच्या घरात हेमंत लोहिया राहत होते, त्याच घरातच त्यांची हत्या करण्यात आली. संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह घरात आढळून आला होता. गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेत त्यांचा नोकर यासिर अहमद याचं नाव समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो खून केल्यानंतर पळताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर हा गेल्या 6 महिन्यांपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या घरी काम करत होता.

दरम्यान, लोहिया यांच्या हत्येच्या 10 तासानंतर टीआरएफ म्हणजे ‘दी रेजिस्टेन्स फ्रन्ट’ या अतिरेकी संघटनेनं या हत्येची जबाबदारी घेतली आहे, अशी माहितीही समोर आलेली आहे. टीआरएफने सोशल मीडियातून या हत्येची जबाबदारी घेतल्याची भूमिका स्पष्ट केली.

आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनं संपूर्ण यंत्रणाच हादरुन गेली. या हत्येनंतर आता जम्मू काश्मिरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे.

Exit mobile version