पाच रुपयांपासून 65 रुपयांपर्यंत अधिक पैसे मोजावे लागणार
| अलिबाग | प्रमोद जाधव |
एसटी महामंडळाने दिवाळीच्या पार्श्वभुमीवर 8 ते 28 नेोव्हेंबरपर्यंत तिकीट दरात दहा टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आता अलिबागमधून लांब पल्ल्याचा प्रवास करताना पाच रुपयांपासून 65 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. दिवाळीत प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
साधारणतः दिवाळीच्या सुट्टीत दर दिवशी 20 हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवासामुळे एसटी महामंडळाला तिकीटाच्या स्वरुपात आर्थिक बळ मिळते. या हंगामाचा विचार करीत एसटी महामंडळाने दिवाळीत 20 दिवस तिकीट दरात वाढ केली आहे. अलिबाग – दादर, अलिबाग – ठाणे, अलिबाग – पुणे, अलिबाग – अक्कलकोट, अलिबाग – कोल्हापूरला जाण्यासाठी वीस रुपयांपासून 65 रुपये मोजावे लागणार आहेत. अलिबाग – रोहा, अलिबाग मुरूड, अलिबाग -पनवेल, – अलिबाग – बोरीवली असा प्रवास करण्यासाठी 10 रुपयांपासून 65 रुपये अधिक पैसे द्यावे लागणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सणासाठी ‘उचल’चा आधार
दिवाळी कर्मचाऱ्यांना आनंदात साजरी करता यावी, यासाठी एसटी महामंडळाने सणासाठी ‘उचल’ योजना सुरु केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला 12 हजार 500 रुपये आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर दर महिन्याला त्यांच्या पगारातून एक हजार 250 रुपये कपात केले जाणार आहे. दहा महिने ही कपात केली जाणार आहे. अलिबाग एसटी बस आगारातील 186 कर्मचाऱ्यांनी दिवाळी उचलची मागणी केली. त्यांना 12 हजार 500 रुपये प्रमाणे 23 लाख 25 हजार रुपये रक्कम देण्यात आली असल्याची माहिती एसटी बस आगारातून मिळाली आहे.