| पनवेल | वार्ताहर |
क्रेनच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तळोजा गावाच्या कमानीजवळ घडली आहे. तळोजा पोलिसांनी या अपघाताला क्रेन चालकाला जबाबदार धरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. प्रदीप प्रल्हाद भालेकर (34) असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून, ते उलवे सेक्टर-2 मधील शक्ती अव्हेन्यु इमारतीत कुटुंबासह राहत होते.
प्रदीप हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. कामानिमित्त तळोजा गाव येथे मोपेड दुचाकीवरून ते गेले होते. तळोजा गावाच्या कमानीजवळ क्रेनच्या सहाय्याने काम सुरू असताना प्रदीप यांनी क्रेनच्या डाव्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याच्या दुचाकीला क्रेनची धडक लागून प्रदीप खाली पडून क्रेनच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले व काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातातील क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे समोर आल्यानंतर तळोजा पोलिसांनी क्रेन चालक अबिद चौगुले याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.