27 मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यावर्षी भारतात मान्सूनचे आगमन वेळेआधीच होणार आहे. येत्या 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तसेच मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार असल्याने शेतकर्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांतली दुसरी वेळदरवर्षी 1 जूनच्या तेवढ्यात मान्सून भारतात दाखल होतो. तसेच 8 जूनपर्यंत संपूर्ण भारतात पसरतो. मात्र, यंदा तीन दिवस आधी म्हणजे 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. जर अपेक्षेप्रमाणे मान्सून तीन आधी भारतात दाखल झाल्यास, वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची गेल्या काही वर्षांतली ही दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून वेळेपूर्वी म्हणजेच 23 मे रोजी दाखल झाला होता.
महाराष्ट्रात मान्सून साधारण 7 जूनपर्यंत दाखल होतो. मात्र, मान्सून जर तीन दिवस आधी केरळात दाखल झाला, तर महाराष्ट्रातही मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार जवळपास 4 ते 6 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर 2025 या काळातला पावसाचा दीर्घकालीन अंदाज आयएमडीने जाहीर केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंज मोहपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितलं की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदा मान्सूनला पोषक परिस्थिती असणार आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेमध्ये 2025 मध्ये 105 टक्के पाऊस कोसळणार आहे.