| पनवेल। वार्ताहर ।
ट्रेलरवर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना उरण-पनवेल मार्गावर गव्हाण फाटा येथे मंगळवारी (ता. 16) सकाळी घडली. ट्रेलर निष्काळजीपणे धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभा केल्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक ब्रिजेश लालपती पाल (वय 26) याला अटक केली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव यज्ञेश कोळी (वय 35) असे आहे.
यज्ञेश उरणच्या करंजा नवापाडा भागात राहत होता. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास यज्ञेश आपल्या दुचाकीवरून पनवेल येथे कामानिमित्त जात होते. या वेळी गव्हाणफाटा ते पनवेल मार्गावरील साई ढाब्यासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर त्यांची दुचाकी जोरात आदळली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.