पद बचावासाठी ग्रामस्थांची केली दिशाभूल; खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विचुंबे गावात शासकीय गुरुचरण जागेची मोजणी करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार संजय भालेराव यांना भाजपचे विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारहाण करणार्या सरपंचावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी नायब तहसिलदार संजय भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, सोमवारी (दि.24) विचुंबे येथील सर्वे नं. 38 या शासकिय गरचरण जागेची मोजणी करताना स्थानिकांचा विरोध होणार हे लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त घेण्यात आला होता. सकाळी 11 वाजता तलाठी हसुराम वाघ, कोतवाल भालचंद्र ढवळे व भुकर मापक रामचंद्र भिवा वाघमोडे यांच्याकडून मोजणीस सुरुवात झाली. मात्र स्थानिक ग्रामस्थ विरोध करीत असल्यामुळे तहसिलदारांच्या आदेशाने भालेराव व पळस्पेचे मंडळ अधिकारी शशिकांत सानप दुपारी 3 वाजता मोजणीच्या ठिकाणी गेले. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच प्रमोद शांताराम भिंगारकर व त्यांच्यासोबत असणार्या अन्य दोघांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना कायदेशीर आदेश दाखवून मोजणी सुरु करण्यास भालेराव यांनी सांगितले. मात्र, भिंगारराव वारंवार अडथळा निर्माण करीत होते. त्यांना नायब तहसिलदार भालेराव यांनी विनंती देखील केली. अखेर सरपंचाने तहसिलदारांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे भालेराव यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी मोबाईमध्ये शूट केला असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
भाजपचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी विचुंबे येथील सर्वे नं. 38 या गुरचरण जागेत निवासी कारणासाठी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यपद रद्द व्हावे, यासाठी प्रणाली पुरुषोत्तम भोईर यांनी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज केला होता. याप्रकरणी पळस्पे येथील मंडळ अधिकार्यांचा अहवाल तहसिदारांकडे प्राप्त झाला होता. या अहवालानूसार, या मिळकतीमध्ये तळ मजला अधिक तीन मजल्यांचे पक्के बांधकाम करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. हे बांधकाम निवासी स्वरुपाचे आहे. त्यात 42 सदनिका असून हे बांधकाम 12 ते 13 वर्षे जुने असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रमोद भिंगारकर यांनी सर्व्हे नं. 38 या सरकारी गुरचरण जागेत विना परवाना बांधकाम करुन अतिक्रमण केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मात्र मोजणीअंती ते स्पष्ट होईल, असे मंडळ अधिकार्यांच्या अहवालावरुन स्पष्ट होईल, तरी तात्काळ मोजणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश पनवेलचे तहसिलदार विजय पाटील यांनी 22 जूर्ल 2024 रोजी भुमी अभिलेख, उप अधिक्षकांना दिले होते. त्या आदेशानूसार ही मोजणी सुरु होती.
सरपंचांचा बनाव, ग्रामस्थांची दिशाभूल?
मोजणी झाली तर सरकारी जागेत केलेले अतिक्रमण बाहेर पडेल. तसेच ग्रामपंचायतीचे पदही रद्द होईल, या भितीने प्रमोद भिंगारकर यांनी नैना प्रकल्पाची मोजणी सुरु असल्याचा बनाव केल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. नैना प्रकल्पाचा विरोध लक्षात घेऊन सरपंचानेदेखील ग्रामस्थांची दिशाभूल करुन मोजणीला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे प्रकरण त्यांच्याच अंगलट आल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे.