आर.सी.एफ.मध्ये स्फोट; व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा

परिसर दणाणला, घबराटीचे वातावरण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

थळ येथील आर.सी.एफ. खत कारखान्यातील बाष्प निर्मिती विभागात बुधवारी स्फोट होऊन तिघाजणांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीररित्या भाजून जखमी झाले. या स्फोटाने सारा परिसर दणाणून गेला असून, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यापूर्वी देखील आर.सी.एफ. कंपनीत अशा दुर्घटना घडल्या असून व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. दरम्यान दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थापनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली आहे.

घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने आरसीएफ प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष दुर्घटनास्थळाची पाहणी केली. तसेच स्फोटानंतर कुठल्याही प्रकारची वायू गळती झाली नसल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

थळ कारखान्यातील बाष्पनिर्मिती संयंत्रामधील नियंत्रण कक्षाच्या एसी सप्लाय आणि इंस्टॉलेशनच्या कामाचा ठेका मेसर्स एरीझो ग्लोबल या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. सदर ठेकेदार कंपनीचे कर्मचारी नवीन एसी युनिटचे इंस्टॉलेशनचे काम करीत असताना स्फोट झाला. या स्फोटात ठेकेदार कंपनीचे पाच आणि आर.सीए.फ.चा एक कर्मचारी जखमी झाले. जखमींना त्वरित आर.सी.एफ. हॉस्पिटल कुरुळ वसाहत येथे हलविण्यात आले. सतत कंपनीमध्ये होत असलेल्या अशाप्रकारच्या दुर्घटनेमुळे कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. व्यवस्थापन त्याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मृतांची नावे
दुर्घटनेत फैजान शेख (वय 32 वर्षे) रा. कुर्ला, दिलशाद इदरिसी (वय 29 वर्षे) कुर्ला हे ठेकेदार कंपनीचे कर्मचारी तर अंकित शर्मा (वय 27 वर्षे) हे आर.सी.एफ. प्रशिक्षणार्थी यांना मृत घोषित करण्यात आले. जखमीमध्ये साजिद सिद्दिकी सलमती (वय 23, रा.कुर्ला, पश्‍चिम ) याला मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये तर 90 टक्के भाजलेल्या अतिंद्र आणि भोनंग येथील जितेंद्र शेळके यांना नॅशनल बोन्स, ऐरोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

परिसरात भीतीचे वातावरण
स्फोटाचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या स्फोटाचे वृत्त अलिबाग तालुक्यात वार्‍यासारखे पसरले. अचानकपणे झालेल्या या दुर्घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कारखान्यात यापूर्वीही असे छोटे मोठे स्फोट होऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. शिवाय अनेकजण जखमीही झालेले होते.या स्फोटाबाबत प्रशासनाने अधिकृत माहिती दिली नाही. घटनेचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासनानेही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. खबरदारी म्हणून आर.सी.एफ. कारखाना आणि कॉलनीतील रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सुरक्षा रक्षकांची मुजोरी
स्फोट घडल्याचे समजताच अलिबाग पोलिस निरीक्षक शैलेश सणस हे आर.सी.एफ. कंपनीच्या गेटवर आले असता त्यांना आत येण्यास सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला. बर्‍याच वेळानंतर त्यांनी पोलिसांची गाडी आतमध्ये जाऊ दिली.

आर.सी.एफ. कंपनीत सायंकाळी दुर्घटना होऊन तिघाजणांचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारची वायूगळती झालेली नाही. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोमनाथ घार्गे,
पोलीस अधिक्षक, रायगड

आर.सी.एफ .कंपनीत झालेल्या स्फोटाची दुर्घटना दुर्दैवी असून कंपनी व्यवस्थापनाने या दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. यापुर्वी देखील अशा दुर्घटना घडल्या आहेत. काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.

आ. जयंत पाटील
सरचिटणीस, शेकापक्ष
Exit mobile version