पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची माहिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाड येथील रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तीन लाखांपेक्षा अधिक शिवप्रेमी गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस सज्ज असून, दीड हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार असल्याची माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
अलिबागमधील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली.
रायगडावर राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा व्हावा, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेण्याबरोबरच पाहणी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमींची रायगडावर येण्यास सुरुवात झाली आहे. काही शिवप्रेमी दाखल झाले आहेत, तर काही आदल्या दिवसापासून रायगडावर येणार आहेत. त्यामुळे अलोट गर्दी दरवर्षी रायगडावर होणार आहे. लाखोंच्या संख्येने येणार्या भक्तांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या मार्गावर वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत. वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक एसटी बसेसबरोबरच वेगवेगळ्या खासगी वाहनांनी भक्त येणार आहेत. त्यांना निश्चित स्थळी लवकर पोहोचता यावा, वाहतूक कोंडीचा फटका बसू नये म्हणून रायगड पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे.
रायगड जिल्ह्यातील दीड हजार पोलिसांबरोबरच बाहेरील जिल्ह्यातूनही पोलीस मागविण्यात आले आहे. सीआरपीएफ जवानांसह शीघ्र कृती दल आदी सुरक्षा यंत्रणा ठिकठिकाणी तैनात केली जाणार आहे. भक्तांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस सज्ज असल्याचे दलाल यांनी सांगितले.
जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा नाही
रायगड जिल्ह्यात मटका, जुगार व अन्य अवैध धंदे सुरु आहेत. या धंद्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्यांना दिल्या आहेत. अवैध धंद्यांना जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही. महिन्याभरात माहिती घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या अखत्यारित आठ सागरी पोलीस ठाणे आहेत. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. सागरी बोटी सहा असून, गस्तीद्वारे किनार्यावरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल. तटरक्षक दलाची मदत घेऊन किनारा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले.