लायन्स क्लब कोलाड यांच्या प्रयत्नाला यश
| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात तसेच कोलाड परिसरात लायन्स क्लब कोलाड ही सेवाभावी क्लब गेली 5 वर्षांपासून कार्यरत आहे. या क्लबतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. तसेच कोलाड येथील गांधी हॉस्पिटल येथे दर बुधवारी डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात येते. चिल्हे आदिवासीवाडी येथील बेंडू पवार यांना गेली 8 ते 9 महिने दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते. त्यांना पूर्णपणे अंधत्व आले होते. याची माहिती मिळताच कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे व क्लबच्या टीम यांनी बेंडू पवार यांच्या डोळयांचे चेकअप करून त्याला चोंढी येथील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. क्लबच्या माध्यमातून त्याच्या डोळयांचे यशस्वीरित्या ऑपरेशन करण्यात आले असून त्यांना नवदृष्टी प्राप्त झाली आहे. एका अंध व्यक्तीला मिळालेल्या दृष्टीने त्या व्यक्तीला नव संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे लायन्स क्लब कोलाडचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कोलाड लायन्स क्लब गेली पाच वर्षांपासून कार्यरत असुन या क्लबची स्थापना रविंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर सानप यांच्या अध्यक्षतेखाली या करण्यात आली.







