धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
| रसायनी | वार्ताहर |
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करू नये म्हणून रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्यावतीने चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत खालापूर तहसीलदार अभय चव्हाण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना निवेदन दिले होते. यावेळी आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगर समाजाला धनगर आरक्षण मिळावे, धनगडऐवजी धनगर जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर व लातूर येथे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज हा अनुसूचित जातीत येत असल्याने त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये, असे मोर्चेकर्यांचे म्हणणे होते. मुळातच धनगर समाजाची मागणी चुकीची आहे, तिला शासनाने मान्यता देऊ नये, दिल्यास सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, मोरबे धरण कृती समितीचे आंदोलन लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अग्निशमन दल, रुग्णवाहिकाही सज्ज ठेवल्या होत्या. खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख कामगीरी केली. निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी शासनाच्या वतीने आदिवासी समाजाचे निवेदन स्वीकारून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.