। महाड । प्रतिनीधी ।
संत निरंकारी मिशन (रजि.) दिल्ली, शाखा-महाड, बिरवाडी व रावतली यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबीराला 100 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वेच्छेने रक्तदान केले. निरंकारी भक्तांच्या सेवा भावनेने प्रेरित होवून इतर रक्तदात्यांनीही या शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेवून रक्तदान केले. संत निरंकारी मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे महाड तहसीलदार सुरेश काशीद यांनी गौरवोद्गार काढले. रायगड 40 अ झोनलचे प्रकाश म्हात्रे, दयाळ पारधी, विठ्ठल कंक, प्रविण करबेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सेवादल युनिट नंबर 357 महाड, सेवादल युनिट नंबर 1882 बिरवाडी यांनी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी रक्तसंकलन जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग यांनी केले. समाजसेवेच्या राष्ट्रीय कार्यक्रमातील सहभागाच्या सन्मानार्थ शासकिय रक्तकेंद्र अलिबाग यांच्या वतीने आयोजक मंडळास सन्मानपत्र बहाल केले. यावेळी संदिप जाधव यांनी रक्तदान केले. जितेंद्र सावंत, नाना नातेकर, डॉ. दीपक गोसावी आदी उपस्थित होते. तर सर्व रक्तदात्यांचे रक्तपेढी कडून प्रमाणपत्र देऊन तसेच मान्यवरांचे संत निरंकारी साहित्य, पुष्प देऊन संत निरंकारी मिशनकडून आभार मानण्यात आले.