तळोजात दहशतीचे वातावरण
। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा सेक्टर 2 येथील एका नामांकित गृहसंकुलात शुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट चाकू आणि कोयत्याच्या हल्ल्यात रूपांतरित झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेत तिघेजण जखमी झाले असून, हल्लेखोर कुटुंब फरार आहे. या घटनेनंतर सोसायटीत भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर अजूनही हल्लेखोर फरार असून तळोजा पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
तळोजा येथील सेक्टर 2 मधील ऑलिव्ह पॅराडाईस सोसायटीमध्ये काही रहिवासी नेहमीप्रमाणे परिसरात उभे होते. त्याचवेळी सोसायटीतील एका महिलेने केलेल्या टिप्पणीमुळे वादाला तोंड फुटले. या टिप्पणीवर प्रत्युत्तर दिल्यानंतर शब्दांची देवाणघेवाण चिघळली. याच दरम्यान शशी सिंग या सदनिका धारकाने खिशातील चाकूची मूठ गौरव सिंग यांच्या डोक्यावर मारली. उपस्थित रहिवाशांनी तातडीने हस्तक्षेप करून भांडण थांबवले. मात्र, काही वेळातच पुन्हा शिवीगाळ सुरू झाल्याने वाद अधिक तीव्र झाला. शशी सिंग याने आपल्या दोन 22 वर्षीय मुलांना चिथावणी दिल्यानंतर त्यांनी चाकू आणि कोयत्याने हल्ला करत पुजा आणि जितेंद्र पितळे या दाम्पत्यांना जखमी केले. भांडणा मध्ये पडणार्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमागे शेअर सर्टिफिकेटचा जुना वाद कारणीभूत असल्याचे तपासात समोर आले आहे.
शशी सिंग यांना सोसायटीकडून शेअर सर्टिफिकेट हवे होते. मात्र, विकसकांचे शिल्लक शुल्क भरले नसल्याने ते देण्यात येत नव्हते. या रागातूनच शाब्दिक बाचाबाची आणि पुढे हिंसक प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शशी सिंग, त्यांची पत्नी व दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिंग कुटूंब अजूनही इमारतीत परतलेले नाहीत. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शिंदे हे या प्रकरणाचा तपास करत असून पोलिसांचे पथक सिंग व कुटूंबियांच्या शोधात आहे. या दरम्यान जखमींवर तळोजातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
