1 लाखांची लाच घेणं भोवलं
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत महसूल विभागातील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांनी कराळेवाडी येथील शेतकर्याच्या दहिगाव येथील जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी शेतकर्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने सापळा रचून कडाव येथील महसूल मंडळ अधिकारी केंडे याला एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
कर्जत तालुक्यातील कडाव येथे महसूल विभागाच्या मंडळ अधिकार्यांचे कार्यालय आहे. केंडे यांनी कराळेवाडी येथील शेतकरी नागेश भालचंद्र तुपे यांच्या जमिनीची फेरफार नोंद सातबारा उतार्यावर करण्यासाठी प्रकरण सादर केले होते. संबंधित प्रकरण तलाठी मार्फत मंडळ अधिकारी केंडे यांच्याकडे मंजुरीसाठी आले होते. 31 डिसेंबर रोजी तक्रारदार यांचेकडे मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांनी सातबारा उतार्यावर फेरफार नोंद कायम करण्यासाठी एक लाखाची लाच मागितली. 7 जानेवारी रोजी संबंधित शेतकर्याने आपल्याकडे मागितलेल्या लाचेबद्दल लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार रायगड लाचलुचपत विभागाने कर्जत तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी कार्यालयाबाहेर सापळा रचला.
यावेळी मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे (रा. नित्य चंद्रदर्शन हाऊसिंग सोसायटी, नागोठणे, ता.रोहा) याने तक्रारदार नागेश तुपे यांच्याकडून जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता एक लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार 8 जानेवारीला सापळा लावण्यात आला होता. यावेळी केंडे यांनी शेतकर्याकडून 1 लाख घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, सचिन आटपाडकर, सागर पाटील यांनी केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात पहाटे साडे तीन वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.
लाचलुचपत विभागाचे आवाहन
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड, अलिबाग कार्यालय दुरध्वनी (02141-222331)/ टोल फ्री क्र. 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा.