। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विरोधात दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती बोरकर आणि न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल होती. ती फेटाळल्यानंतर याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयास आव्हान देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, घटनेचा आधार घेऊन याचिका फेटाळली आहे का? हे आम्हाला तपासावे लागेल. या याचिकेवर सुनावणी दरम्यान आम्ही अनेक राज्यांचे दाखले दिले होते. मात्र न्यायालयाने त्याचा विचार केलेला दिसत नाही.
न्यायालयीन प्रक्रियेत भाजपच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला आहे. या प्रकरणात देखील भाजपच्या काही लोकांचा हात आहे असा आम्हाला वास येत आहे, असा आरोप सुनील मोदी यांनी भाजपवर केला. या निकालामुळे महायुतीकडून दिलेल्या नव्या सात आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा आहे. यापूर्वीच महायुतीने सात जणांची नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत. आता आणखी पाच नाव देखील महायुतीकडून जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे. त्यावर बोलताना सुनील मोदी यांनी महायुती नव्याने करण्यात येणार्या या सर्वच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवर आम्ही आक्षेप घेणार असल्याचे सांगितले.