| मुरूड | वार्ताहर |
गणेशोत्सवानंतर होळीकोत्सव हा कोळी बांधवांचा महत्वाचा सण असल्याने हा सण साजरा करण्यासाठी मुरूड तालुक्यातील सर्व कोळीवाडे सज्ज झाले आहेत. तालुक्यात कोळी समाजाची मोठी लोकवस्ती आहे. मुख्य होळीच्या आधी 15 दिवस समुद्रकिनाऱ्यावर छोट्या स्वरूपात कोळी बांधवांच्या बाळगोपाल मंडळींकडून दररोज रात्री होळी पेटविली जाते अशी माहिती कोळी समाजातील ज्येष्ठ नेते मनोहर बैले यांनी दिली. तालुक्यातील राजपूरी, एकदरा, नांदगाव या गावच्या नौका मुंबईतून येण्यास सुरुवात झाल्याची माहिती नाखवा रोहन निशानदार यांनी दिली. आमच्या दाराशी हाय शिमगा…. अशी पारंपरिक गाणी गुणगुणत, फुलांच्या माळांनी सजवलेल्या होड्या गावी दाखल होताना दिसून येत आहेत.
मुंबईत मासेमारीसाठी वास्तव्यासाठी असणाऱ्या शेकडो नौका मुरूड, राजपुरी, एकदरा, राजपूरी, नांदगांव, बोर्ली, मजगाव येथे आपापल्या गावी झुली, पताका, झेंडे, फुलांनी सजवून वाजत गाजत येऊ लागल्या आहेत. 21 ते 22 मार्चपर्यंत तालुक्यातील मुंबईत असणाऱ्या शेकडो नौका दरवर्षीप्रमाणे गावी येणार आहेत. तालुक्यात कोळी बांधवांचा पारंपारिक, आनंददायी होळी सण पाहण्यासाठी परदेशी पर्यटक, बाहेर गावचे पर्यटक देखील येत असतात. मुख्य होळीच्या दिवशी मुरूड बाजारपेठ भागात सुपारी झाड नाचविण्याची वेगळी परंपरा अद्यापही सूरु आहे. कोळीवाड्यात धुलीवंदनाच्या दिवशी कोळीबांधव पारंपरिक वेशभूषा करून नृत्य करण्याची परंपरा पाहायला मिळते. होळीच्या मुख्य दिवशी म्हणजे हुताशनी पौर्णिमादिनी कोळी महिला-पुरुष, तरुण-तरुणी, मुले रात्री होळी मैदानावर एकत्र येऊन फेर धरून होळीची गीते गात पारंपरिक नृत्य करतात. विधिवत पूजन झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.