अलिबाग । प्रतिनिधी ।
आक्षी येथील समुद्रकिनारी मंगळवारी (दि.18) एका 55 वर्षीय इसमाचा मृतदेह सायंकाळच्या सुमारास सापडला. समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेला असता त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली.
गजानन बामजी असे मृत इसमाचे नाव आहे. हा इसम आक्षी येथील साखर गावातील रहिवासी आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यात त्याला फिटही येत होती. मंगळवारी सायंकाळी तो समुद्रात जाळे टाकून मासे पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो तेथील स्थानिकांना बेशुध्द अवस्थेत दिसला.
त्याला तातडीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार सुजय मगर अधिक तपास करीत आहेत.