जगात ‘बोको हराम’ संघटना, महाराष्ट्रात ‘खोके हराम’ संघटना

। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राज्यात यंदा पाऊसही तुफान झाला आहे, पण विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. येथे सर्व सत्ताभोगी असून जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे. हा अकलेचा दुष्काळ शेवटचे दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱ्यांवर आला असल्याचे शिवसेनेने म्हटले.

तसेच, जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत अशा शब्दात शिवसेनेने शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. खोके हराम गटाचे अस्तित्व फार काळ राहणार नसल्याचे शिवसेनेने म्हटले. विधीमंडळ अधिवेशनात शिवसेना, महाविकास आघाडीने शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

खोक्यांमुळे महाराष्ट्र बदनाम
महाराष्ट्रात व बाहेर जेथे जावे तेथे लोक खोकेवाल्यांच्या नावाने बोंब मारीत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’

त्यांच्या पिढ्यांना ‘खोकेवाले’ उपाधी लागणार
शिवसेनेने म्हटले की, विधीमंडळ अधिवेशनात खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला. पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब वगैरे उपाध्या लावल्या जात. पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल.

शिंदेवर टीका
विधिमंडळाच्या पायऱयांवर बसलेल्या खोका आमदारांचे हे विचित्र चाळे मुख्यमंत्री स्वतः पाहत होते व त्यांनी या आमदारांना भल्याच्या चार गोष्टी सांगितल्या नाहीत. कारण आडातच नाही तेथे पोहोऱ्यात कोठून येणार? हाच प्रश्न आहे. त्या खोका आमदारांचा माकडखेळ पाहत आपले मुख्यमंत्री उभे राहिले व खोकेवाल्यांची कहाणी सफल झाली असल्याचा टोला शिवसेनेने लगावला.

Exit mobile version