खालापुरमध्ये ड्रोनद्वारे सीमानिश्चिती

तालुक्यातील 102 गावांचा सर्वे पूर्ण

| रसायनी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील गावठाणांचे ड्रोनद्वारे करण्यात येणारे सर्वेचे काम प्रगतीपथावर असून, तालुक्यातील कुंभिवली व उंबरे या गावांतील लोकांना सनद वाटप करण्यात आले. खालापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार आयुब तांबोळी, उपअधीक्षक भूमि अभिलेख खालापूर शरद काळे, गटविकास अधिकारी खालापूर संदीप कराड, तहसीलदार पूनम कदम व नगरपंचायत खालापूरचे मुख्याधिकारी रश्मी राठोड यांच्या उपस्थितीत हा सनद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुंभिवली व उंबरे या गावातील ड्रोन सर्वे पूर्ण झाला आहे, त्याची सनद वितरण कार्यक्रम तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.

खालापूर तालुक्यात 102 गावांचे ड्रोन सर्व्हे कामकाज पूर्ण झाले. त्यापैकी 85 गावांची चौकशी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 17 गावांचे कामकाज अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामकाज पूर्ण करण्यात येईल. तालुक्यात अद्यापपर्यंत 47 गावांचे सनद वाटप करण्यात आले असून, त्यात 17 लाखांच्या वर रकमेची सनद फी शासन जमा झाली असून, साधारण 2718 इतक्या धारकांनी सनद प्राप्त करून मिळकतीचे मालकी हक्क प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्य शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत गावठाणमधील सर्व लोकांच्या फायद्याची असून, शासनाने गावठाणमधील नागरिकांना खऱ्या अर्थाने आज मिळकतीचे मालक म्हणून सनद दिली आहे, अशी माहिती उप अधीक्षक भूमि अभिलेख खालापूर कार्यालयाचे कार्यालय प्रमुख शरद काळे यांनी दिली आहे.

Exit mobile version