बोरखारच्या दिपाली ठाकूरचा कोट्यवधींचा घोटाळा उघड

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील जनतेला हादरवून सोडणारा जवळपास 10 ते 12 कोटी रुपयांचा घोटाळा बोरखार गावात उघड झाला आहे. दिपाली अमित ठाकूर रा. बोरखार, उरण हिने मर्चंटिंग कंपनीच्या नावाखाली आणि कांता जयप्रकाश ठाकूर रा. जसखार, उरण हिची मुलगी असल्याचा विश्वास संपादन करून अनेक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी न्हावा- शेवा पोलीस स्टेशन, जेएनपीटी उरण येथे गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर आश्चर्यकारकरित्या काही दिवसांतच तिला जामीन मंजूर झाला. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, उरण येथील मेघनाथ जनार्दन ठाकूर यांचे जयप्रकाश ठाकूर व काकी कांता ठाकूर नातेवाईक असल्यामुळे दिपालीने विश्वास संपादन करून, मार्चंटिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल, अशा गोड आश्वासनांनी कोट्यवधी रुपयांची उकळी केली. आरोपी दिपाली ठाकूर हिने मेघनाथ ठाकूर यांना तीन वेगवेगळ्या करारांत पैसे गुंतवायला लावले. यामध्ये 15 लाख दिल्यास 3 वर्षांसाठी दर दोन महिन्याला 5 ते 6 लाख, 10 लाख दिल्यास दर महिन्याला 8.50 लाख एका वर्षासाठी आणि आणखी 10 लाख दिल्यास 5 वर्षांसाठी दर दोन महिन्याला 2 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. यासाठी कौस्तुभ सुरेंद्र डाकी (बोरखार) याचे बाँड घेऊन, जर मी पैसे बुडवले तर राहते घर किंवा आवारातील जागा तुला देईन, असे लिहून दिले. तसेच निर्मला सुधीर पाटील (न्हावा) व शहाबुद्दीन शेख (मुंबई) हे बिझनेस पार्टनर असल्याचे सांगितले.

मेघनाथ ठाकूर यांच्या तक्रारीनूसार, आरोपीने त्यांच्या आईच्या घराची (कांता जयप्रकाश ठाकूर) व सासरच्या (अमित सुरेश ठाकूर) घर व जमिनीची विक्री करून पैसे देण्याचे तोंडी सांगितले होते. पण प्रत्यक्षात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतल्यावर त्यांना एकही रुपया परत दिला नाही. पैशांच्या मोबदल्यात बॉण्ड पेपरवर इतर दोन लोकांच्या नावाने (सीताराम थली, विंधणे), (कांता जयप्रकाश ठाकूर) करार, तसेच काही रकमेचे चेक देण्यात आले. मात्र, हे सर्व चेक बाऊन्स झाले आणि संबंधित बँक खाती बंद करण्यात आली.

दिपाली ठाकूर हिने इतर गुंतवणूकदारांना जर पोलिसांत गेलात तर पैसे मिळणार नाहीत, अशा धमक्या दिल्या. यामुळे बऱ्याच लोकांनी तक्रार करण्यास टाळाटाळ केली. मात्र, सात-आठ महिन्यांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर अखेर न्हावा-शेवा पोलिसांनी मोठी कारवाई करत दिपाली ठाकूरला बेड्या ठोकल्या.
सामान्य माणसाला एखाद्या छोट्या गुन्ह्यातसुद्धा अनेक दिवस पोलीस कोठडीत ठेवले जाते, पण कोट्यवधींच्या घोटाळ्यानंतरही आरोपीला काही दिवसांतच मोकळं सोडण्यात आलं, हा दुहेरी न्याय सहन केला जाणार नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version