बॉक्सर सतीश कुमार स्पर्धेबाहेर

| टोक्यो | वृत्तसंस्था |
भारताचा 91 किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर सतीश कुमार टोक्यो ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्‍वविजेता बखोदिर जलोलोवने सतीशला स्पर्धेबाहेर ढकलले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत तिन्ही फेर्‍यांत जलोलोव प्रभावी ठरला. पहिल्या फेरीत सतीश जलोलोवर सरशी साधेल, असे वाटत होते. पण, त्यानंतर पुढच्या फेर्‍यांत तो बचाव करतानाच दिसला.

उझबेकिस्तानच्या बॉक्सरने सतीशचा 5-0 असा पराभव करून आपले पदक निश्‍चित केले. तत्पूर्वी, त्याने आपला उपउपांत्यपूर्व सामना अझरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेवविरुद्ध एकतर्फी जिंकला. तत्पूर्वी, सतीश कुमार मागच्या सामन्यात जखमी झाला होता. त्यामुळे त्याचे खेळणे देखील निश्‍चित नव्हते. जमैकाच्या रिकार्डो ब्राउनविरुद्धच्या सामन्यात सतीशच्या हनुवटीवर आणि उजव्या डोळ्याला मार बसला होता. यानंतर त्याला 7 टाके पडले. सतीशने हा सामना 4-1 असा जिंकला होता.

दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून एकूण 9 बॉक्सर सहभागी झाले होते. पण फक्त एका बॉक्सरने पदकाला गवसणी घातली. महिलांच्या वेल्टरवेट प्रकारात लव्हलीनाने हे पदक निश्‍चित केले आहे. हेवीवेट प्रकारात ऑलिम्पिक रिंगमध्ये प्रवेश करणारा सतीश कुमार हा पहिला भारतीय बॉक्सर ठरला.

Exit mobile version