बुडालेल्या दोन भावांचे मृतदेह शोधण्यासाठी केली मदत
| गडब | वार्ताहर |
पावसाळी पर्यटन जीवावर बेतल्याची घटना पेण तालुक्यातील पाबळ येथे घडली आहे. पावसाळी पिकनिक साठी आलेल्या रेवदंडा-थेरोंडा येथील इलान बेंजामीन वासकर (25) व इजरायल बेंजामीन वासकर (22) या दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना पेण तालुक्यातील पाबळ येथे सोमवारी (दि.17) सायंकाळी घडली. त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी येथील स्थानिक बहाद्दर तरुणांनी जिवाची बाजी लावली. त्यांचा वडखळ पोलिसांकडून सत्कार करण्यात आला.
दरम्यान, जोरदार पडणारा पाऊस नदीचा प्रचंड प्रवाह यामुळे मृतदेह शोधणे मोठे आव्हान असतानाच येथील भौगोलिक परिस्थितीची माहिती असणारे येथील स्थानिक तरुण संतोष भस्मा, संजय उघडा राहाणार कोंडवी, संतोष भोईर राहाणार निगडे यांनी पुढे येत पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत मृतदेह शोधून काढण्यात महत्त्वाची कामगिरी केली. या कामगिरीबद्दल त्यांंचा वडखळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक आर.पी. शिद, रणजित जाधव, सहाय्यक फौजदार थळकर, वडखळ पोलीस ठाण्याचे हवालदार अमोल म्हात्रे, धुपकर, देसाई आदी उपस्थित होते.
पाबळ नदीत बुडालेले इलान वासकर व इजरायल वासकर हे वीर हनुमान नागाव खारगल्ली संघातून कबड्डी खेळायचे. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे रायगड जिल्हा कबड्डी परिवाराकडून व परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.