। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशभरातीस सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशभरातील तरूण या योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारची ही योजना 4 वर्षांचीच असून त्यानंतर रोजगाराची संधी काय? असा या तरूणांचा आक्षेप आहे. देशभरातून हिंसक विरोध होत असूनही सरकार अंमलबजावणी करण्यावर ठाम आहे. याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयानं महत्वाचा निर्णय घेतलाय. अग्निपथ योजनेअंतर्गत सेवेत 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतलाय.
अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा 3 वर्ष वयाची सूट दिली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढं 5 वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय. केंद्र सरकारनं लष्करभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नव्यानं भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्याची दखल घेत सरकारनं 2022 साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयामध्ये यंदा सूट देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 2022 अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे अशी करण्यात आलीय.