पदकतालिकेत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पहिल्या दिवसापासून खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत आगेकूच करणाऱ्या महाराष्ट्राच्या कामगिरीस गुरुवारी खीळ बसली. वैभवराजे रणदिवेच्या नेमबाजीतील कांस्यपदकाचा महाराष्ट्राला दिलासा मिळाला. आज एकाच पदकावर समाधान मानावे लागल्याने पदककालिकेत महाराष्ट्राला पाचव्या स्थानावर घसरावे लागले. महाराष्ट्राची 8 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी एकूण 26 पदके झाली आहेत. हरियाणा (34, 36, 18) 88 पदकांसह आघाडीवर कायम आहे.
उत्तर प्रदेशाची (24, 17, 9) 50, तर तमिळनाडूची (17, 6, 11) 34 आणि गुजरातची (9, 15, 11) 35 पदके झाली असून, ते अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्राला गुरुवारी नेमबाजीत वैभवराजे रणदिवे याने 109 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 प्रकारात कांस्यपदक मिळवून दिले. वैभवराजने पात्रता फेरीत 143 गुणांची कमाई करताना मुख्य फेरीत प्रवेश केला होता. मु्ख्य फेरीत त्याचे प्रयत्न चांगले होते. पण, हरियाणाच्या मनिष नरवाल आणि राजस्थानच्या रुद्रांश खंडेलवाल यांच्या अचूकतेचा त्याला सामना करता आला नाही. वैभवराजला 211.6 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 10 मीटर एअर रायफल प्रोन एसएच 2 प्रकारात नरेंद्र देवप्रयाग गुप्ताला 610.9 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
टेबल टेनिसपटूंची आगेकूच
टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला 3 ते 4 पदकांची अपेक्षा आहे. अशोक कुमार पाल, दत्त प्रसाद चौगुले आणि विशाल तांबे यांनी पहिल्या फेरीत एकतर्फी विजय मिळविला. महिला विभागात पृथ्वी बर्वेलाच आगेकूच कायम राखता आली. नयना कांबळे आणि उर्मिला पाल यांना पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष गटात स्वप्निल शेळकेचा पराभव झाला.
