। मुंबई । प्रतिनिधी ।
वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत भाडे तत्वावर राहणार्या भावा- बहिणीने कर्जाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पंधरा दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. घरचा दरवाजा उघडला नसल्यामुळे घरातून दुर्गंधी पसरू लागली होती. त्यामुळे घरमालकाने पोलिसांना बोलावून ड्युप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी बहिण-भावाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले.
हनुमंता श्रीधर प्रसाद (40) आणि यमुना श्रीधर प्रसाद (45) असे या मृत भावा-बहिणीचे नाव आहे. हे दोघेही वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत राहत असून दोघेही कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर 25 लाखांचे कर्ज होते. तसेच, ऑफीसमधील काही लोक आणि मोठ्या भावाकडून ते उसने पैसे मागत होते. अखेर कर्जाला कंटाळून या बहीण-भावाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.