वयोवृध्द महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी दिला मदतीचा हात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
उन्हात उभे राहून कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसाने एका वयोवृध्द महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी मदतीचा हात दिला. चोंढी नाका येथील रस्ता कायमच वर्दळीचा राहिला आहे. वाहनांच्या वर्दळीत वयोवृध्द महिलेला रस्ता ओलांडताना भिती वाटत होती. मात्र, वाहतूक पोलिसाने माणुसकी दाखवत वयोवृध्द महिलेला रस्ता ओलांडण्याची मदत करीत सुरक्षीत ठिकाणी सोडण्याचे काम केले.
रायगड पोलीस दलात जिल्हा वाहतूक शाखा ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम केले जाते. जिल्ह्यात 90 हून अधिक वाहतूक पोलीस आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ या बारा तासामध्ये जिल्ह्यातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस कंबर कसतात. वाहतूक पोलीस नाक्यावर उभे राहिल्यावर वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणारादेखील त्या बाजूने जात नाही, अशी वाहतूक पोलींसाचा अंकुश राहिला आहे.
खार्की वर्दीतला पोलीस असो, अथवा सफेद पोशाखातील वाहतूक पोलीस असो यांचा एक वेगळा दबदबा समाजात कायमच राहिला आहे. पोलीस दिसल्यावर गुन्हेगारदेखील तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु, सामान्यांना पोलिसांचा आधार ही मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. अलिबाग – रेवस मार्गावर चोंढी नाका येथे बुधवारी सकाळी वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत होता. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर लक्ष ठेवून वाहतूक पोलीस काम करीत होते. चोंढी नाका प्रवाशांना घेण्यासाठी एसटी बस थांबली. त्यामुळे एसटीच्या मागे असलेल्या अनेक वाहनांनादेखील थांबावे लागले.
दरम्यान, एका वयोवृध्द महिलेला रस्ता ओलांडून जायचे होते. परंतु, वाहने उभी असल्याने रस्ता ओलांडण्यास ती महिला घाबरत होती. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला मोठ्या विश्वासाने आवाज देत रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागितली. तात्काळ त्या पोलिसाने रस्ता ओलांडण्यासाठी मदतीचा हात दिला. त्यामुळे वयोवृध्द महिलेच्या चेहर्यावर एक वेगळा आनंद दिसून आला. दिवसभर उन्हात उभे राहून कर्तव्य बजावणार्या पोलिसाने माणूसकी जपली. जनतेच्या सेवेसाठी पोलीस कायमच आहेत, हे वाहतूक पोलिसाच्या माणुसकीतून दिसून आले.