। पालघर । प्रतिनिधी ।
पालघरमध्ये भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगेश आणि पूजा विश्वकर्मा अशी मृतांची नावे आहेत.
पालघर माहीम रस्त्यावरील हरणवाडी येथील एका रहिवासी संकुलात मंगेश आणि पूजा विश्वकर्मा आपल्या कुटुंबासह राहत होते. मंगळवारी (दि. 13) रात्री 11 वाजताच्या सुमारास ते दोघे जेवण करून आईस्क्रीम खाण्यासाठी पालघर शहरात गेले होते. आईस्क्रीम खाऊन ते दुचाकीवरून घराकडे जात असताना भरधाव ट्रेलरने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.