अनैतिक संबंधाच्या संशयावरून सख्या भावावर प्राणघातक हल्ला 

| रोहा | प्रतिनिधी |

आपल्या पत्नी सोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून भावाने आपल्या सख्या भावाला लोखंडी सळईने जबर मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भावावर प्राणघातक हल्ला करुन आरोपी घटनास्थळा वरून फरार झाला. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करुन बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार धाटाव परिसरातील महादेववाडी गावात घडला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारविणे गावातील शिद कुटुंब गणेशोत्सवासाठी महादेववाडी या मूळ गावात आले होते. मंगळावारी (दि.2) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिद कुटुंबातील सदस्य गणपती विसर्जनासाठी नदीकाठी गेले होते. त्यावेळी लहू शिद याने या संधीचा फायदा घेत आपल्या पत्नी सोबत भावाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत त्याने घराच्या ओटीवर बसलेल्या रमेश शिद याच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करून जीवघेणा हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रमेश शिद याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती पाटील आपल्या पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची शोधमोहिम सुरु केली. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेऊन त्याला तात्काळ पोलिसांनी अटक करुन त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत त्याची पत्नी सुवर्णा लहू शिद हिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version