शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपविला मृतदेह; 65 वर्षीय आरोपीला अटक
। पुणे । प्रतिनिधी ।
भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक अमानवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या आणि बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही चिमुरडी सुट्ट्यांमध्ये आपल्या आजीकडे राहण्यासाठी नसरापूर येथे आली होती. घरासमोर खेळत असताना गावातीलच एका 65 वर्षीय व्यक्तीने तिला फूस लावून जवळच्या गोठ्यात नेले. तिथे त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर, त्याने तिची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढ्यावरच न थांबता, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने चिमुरडीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबून ठेवला. दुपारपासून मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी परिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, आरोपी त्या चिमुरडीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला आणि या भयानक कृत्याचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला ताब्यात घेतले.
या घटनेनंतर शुक्रवारी (दि.1) रात्री नसरापूर येथील वातावरण तापले होते. संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.







