माजी नगरसेवक किशोर पानसरे यांची मागणी
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील जनतेचा त्रास कमी होण्यासाठी सर्व शासकीय कार्यालय खोपोली शहरात एकाच इमारतीत सुरू करा अशा मागणीचे निवेदन पत्र माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी मुख्याधिकारी,प्रशासक डॉ.पंकज पाटील यांच्याकडे केली असून जिल्हाधिकारी,नगर भूमापन अधीक्षक यांनीही निवेदन दिले आहे.
जनतेच्या सुविधेसाठी खोपोली नगरपरिषदेने नगर भूमापन कार्यालयासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील इमारतीत जागा उपलब्ध करून दिली होती.उपअधीक्षक भूमी अभिलेख खालापूर यांनी नगरपरिषदेला यांनी पालिकेच्या नवीन इमारतीमध्ये कार्यालय स्थलांतर करण्यासाठी नगर परिषद कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता.भूमापन अधिकारी आणि तलाठी कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील एकाच इमारतीमध्ये होते. इमारत धोकादायक झाल्यामुळे तलाठी कार्यासाठी साहित्यरत्न कै.र. वा. दिघे स्मारकाजवळ जागा उपलब्ध करून देण्यात आली.परंतु भूमापन अधिकारी कार्यालय खालापूरला स्थलांतर केल्याने नागरिकांना भूमापन कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी खालापूरला जावे लागत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळेच भूमापन अधिकारी खोपोलीत सुरू करण्याची मागणी किशोर पानसरे यांनी केली आहे.